महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सर्वात उशिरा कोरोना बुलेटिन प्रसिद्ध करणारा जिल्हा 'कोल्हापूर'

बहुतांश जिल्ह्यात मेडिकल बुलेटिन रात्री 9 च्या आधीच मिळतात. मात्र, कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून अधिकृत माहिती रात्री साडे अकरा ते बारापर्यंत दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

कोल्हापूर कोरोना अपडेट
कोल्हापूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 30, 2020, 5:16 PM IST

Updated : Jul 30, 2020, 5:59 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोल्हापुरात कोरोना मृतांची संख्या सुद्धा 160 पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सीपीआर प्रशासनाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती मात्र राज्यात सर्वात उशिरा दिली जात आहे, अशी बाब समोर आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

बहुतांश जिल्ह्यात मेडिकल बुलेटिन रात्री 9 च्या आधीच मिळतात. मात्र, कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून अधिकृत माहिती रात्री साडे अकरा ते बारापर्यंत दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

26 मार्च रोजी कोल्हापुरातील भक्तीपूजानगरमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर परजिल्ह्यातून येणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येऊ लागले. अशा वेळी कोरोनाबाबत अधिकृत माहिती वेळेत मिळणे गरजेचे होते. मात्र, तत्कालीन अधिष्ठाता यांच्याकडून चक्क कोऱ्या कागदावर नवीन आढळलेल्या रुग्णांबाबत माहिती लिहून दिली जात होती. त्यानंतर "सीपीआर रुग्णालयाचा सावळा गोंधळ.. कोऱ्या कागदावर दिली जातेय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती, जिल्हा व्हेंटिलेटरवर" अशा आशयाची 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर दोन दिवसानंतर लगेचच सीपीआरकडून अधिकृत माहिती मिळायला सुरुवात झाली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या सूचनेनुसार सकाळी 10 वाजता आणि रात्री 10 वाजता बुलेटिन प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वेळेत माहिती मिळू लागली. मात्र, आता पुन्हा एकदा अधिकृत माहिती द्यायला उशीर होऊ लागला आहे. ही माहिती राज्यात सर्वात उशिरा दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 5799 कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 162 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर खाटा उपलब्ध नसल्याने आणि वेळेत उपचारासाठी दाखल करून घेतले नसल्याने मृत्यू झाल्याची सुद्धा काही उदाहरणे आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून दररोजच 400 हुन अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा वेळेत माहिती मिळणे गरजेचे आहे.

सकाळी 10 चे मेडिकल बुलेटिन दुपारी 2 तर कधी कधी 3 पर्यंत मिळत नाही. आणि रात्री 10 चे बुलेटिन रात्री 12 पर्यंत मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांची माहिती घेतली असता राज्यात सर्वात उशिरा कोल्हापूर जिल्ह्यात माहिती दिली जाते, अशी गंभीर बाब समोर आली आहे.

काही जिल्ह्यांमध्ये दिवसभराची आकडेवारी किती वाजता दिली जाते यावर एक नजर :

1) मुंबई - सायंकाळी 7:30 ते 8:30
2) नागपूर - सायंकाळी 7 पर्यंत
3) पुणे - रात्री 10 पर्यंत
4) औरंगाबाद - सायंकाळी 8 पर्यंत
5) वाशिम - सायंकाळी 6 पर्यंत
6) परभणी - सायंकाळी 8 पर्यंत
7) लातूर - सायंकाळी 8 पर्यंत
8) नांदेड - सायंकाळी 6 पर्यंत
9) बीड - रात्री 10 पर्यंत
10) हिंगोली - सायंकाळी 7 पर्यंत
11) जळगाव - सायंकाळी 8:30 पर्यंत
12) अकोला - सायंकाळी 7 वाजता
13) जालना - सायंकाळी 6 वाजता
14) सांगली - सायंकाळी 8 ते 9 पर्यंत
15) धुळे - रात्री 11 पर्यंत
16) गोंदिया - सायंकाळी 7 पर्यंत
17) गडचिरोली - सायंकाळी 8 पर्यंत
18) अहमदनगर- सायंकाळी 7 पर्यंत
19) चंद्रपूर - सायंकाळी 7 ते 8 पर्यंत
20) वर्धा - रात्री 9 ते 10 पर्यंत

अशा प्रकारे सर्वच जिल्ह्यांमध्ये वेळेत माहिती दिली जाते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र हीच माहिती सर्वात उशिरा दिली जात आहे. याबाबत सीपीआर प्रशासनाला त्यांनी बनविलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर माहिती विचारली असता ते म्हणतात, आम्ही वेळेत डेटा सीएस कार्यालयाकडे सोपवितो, बुलेटिनला कधीकधी खूप उशीर होतो, याला सीएस कार्यालय जबाबदार आहे. म्हणजेच सिव्हिल सर्जन बी. सी. केम्पी पाटील यांना याबाबत विचारा असे स्पष्ट सांगितले जाते. पण केम्पी पाटील यांना याबाबत विचारले असता ते सांगतात. एमएस ऑफिसकडूनच माहिती उशिरा मिळते आणि याबाबत माहिती लवकर मिळावी म्हणून आम्ही पत्र सुद्धा दिले आहे. शिवाय जिल्ह्यातील दररोजच 400 ते 500 रुग्ण आढळत असल्यामुळे माहिती गोळा करायला उशीर होत असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा सूचना देण्याची गरज :

मेडिकल बुलेटिन वेळेत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 19 मे रोजी आदेश काढला होता. मात्र, याची आता अंमलबजावणी होत नसून याकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.

Last Updated : Jul 30, 2020, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details