महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेळगाव पोटनिवडणूक : समितीकडून शुभम शेळकेंचे नाव जाहीर; रंगणार तिरंगी सामना

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा अध्यक्ष शुभम शेळके यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

By

Published : Apr 3, 2021, 7:56 PM IST

शुभम शेळके
शुभम शेळके

कोल्हापूर - 17 एप्रिलला कर्नाटकातील बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. यासाठी एकीकरण समितीतर्फे नेमका कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा अध्यक्ष शुभम शेळके यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे समितीकडून अधिकृत कोण असणार ही उत्सुकता आता संपली आहे. शुभम शेळके यांना ओळखणारा मोठा वर्ग आहे. शिवाय मराठी भाषिकांवर अन्याय होत होता तेव्हा वेळोवेळी त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळेच शिवसेनेनेसुद्धा एकीकरण समितीलाच पाठिंबा जाहीर केला आहे.

शुभम शेळके यांचे नाव जाहीर होताच भाषिकांमध्ये समाधान -

काल शुक्रवारी शहर समितीची अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समितीने लोकसभा निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. शिवाय शिवसेनेच्या के. पी. पाटील यांनीसुद्धा या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिवसेनेने समितीला पाठिंबा जाहीर करत के. पी. पाटील यांचा आज अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शुभम शेळके यांना शिवसेना आणि समितीकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली आहे. मराठी भाषिकांमध्येसुद्धा शेळके यांचे नाव जाहीर झाल्याने समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवाय अनेक ठिकाणी आता प्रचारसुद्धा सुरू झाला असून आता मराठी भाषिकांची ताकद दाखवावी लागेल असेही म्हंटले जात आहे.

अशी असेल लढत -

सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगावमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सलग चारवेळा याठिकाणी भाजपाचीच मक्तेदारी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अंगडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मंगल अंगडी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके या तरुण आणि लोकप्रिय कार्यकर्त्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून याठिकाणी भाजपाची मक्तेदारी आहे, पण गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय आणि कन्नड संघटनांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात काही प्रमाणात वातावरण निर्माण होतात पाहायला मिळत आहे.

मराठी भाषिकांची मते निर्णायक असणार -

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 6 ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वी याठिकाणी महाराष्ट्रात एकीकरण समितीचेच जास्त आमदार पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्हनगुत्ती प्रकरणासह बेळगाव महापालिकेसमोर लावण्यात आलेल्या वादग्रस्त झेंड्याच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या गाडीवरसुद्धा कन्नड संघटनांनी हल्ला केला होता. त्यानंतर सातत्याने या सीमाभागात वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार? मराठी भाषिक कोणाला मत देणार हेच पाहावे लागणार आहे.

समितीकडून प्रचाराची जय्यत तयारी, मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी उद्घाटन -

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. रविवारी 4 मार्चला सायंकाळी रंगुबाई पॅलेस येथे या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details