जालना - एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटलसमोर सरस ठरेल, अशी जालन्यातील स्त्री रुग्णालयाची शासकीय इमारत आहे. मात्र स्त्रियांच्या आजाराशी निगडीत असलेल्या तपासणी यंत्रणेचा अभाव या ठिकाणी आहे.
या स्त्री रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे विशेष करून गर्भवती महिलांची गैरसोय होत आहे. सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अशा गर्भवती महिलांसाठी धोका वाढला आहे.
सोनोग्राफी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉक्टरांचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित महिलेची जालना शहरातील काही खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली जाते; आणि या बदल्यात शासनाकडून रुग्णालयाला एका सोनोग्राफीचे चारशे रुपये दिले जातात. या सर्व प्रकारासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना चार महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती. यानंतर त्यांनी आठ दिवसांत जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित होणार असल्याचे आदेश दिले. मात्र, चार महिने उलटूनही ही अद्याप ही मशीन कार्यान्वित झाली नाही. सामान्य रुग्णालय आता याच स्त्री रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयाची पूर्ण इमारत आता कोरोना रुग्णालय म्हणून कार्यान्वित केली आहे.