जालना -आज NTAGI ची दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत बूस्टर डोस (Booster Dose) आणि लहान मुलांचे लसीकरण (Vaccination For Children) या संदर्भात चर्चा होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याबाबत या बैठकीत केंद्राने निर्णय घेतल्यास हा निर्णय स्वागतार्ह राहील, अशी प्रतिक्रियाराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी शाळा बंद आहे. तेथील शाळा लवकर सुरू करा, अशी सूचना करण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.
काय म्हणाले राजेश टोपे -
राज्याच्या टास्क फोर्सची (Covid Task Force) अंतर्गत मिटिंग आज होणार असून या बैठकीत राज्यातील ओमायक्रॉनबाबत (Omicron In Maharashtra) आढावा घेतला जाणार आहे. लहान मुलांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळण्यासाठी आग्रह या बैठकीत धरला जाणार असून बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रह धरण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. सध्या राज्यात 9 रुग्ण असून काँटॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरू आहे. विमानतळावर स्क्रिनिंग सुरू असून पॉझिटिव्ह असलेल्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात आहे. सध्या राज्यात जिनोमिक सिक्वेसिंगच्या 3 लॅब असून (Genome Sequencing Lab In Maharashtra) आणखी 2 लॅब वाढवणार आहेत. या संदर्भात लवकर मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन औरंगाबाद आणि नागपूर येथे आणखी 2 लॅब सुरु करू, अशी माहितीही टोपे यांनी दिली.