महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात चोरीस गेलेल्या धनादेशाद्वारे ३३ लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न फसला

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून सहा धनादेश चोरीला गेले होते. या धनादेशांच्या माध्यमातून ३३ लाख ८६२४ रुपये हडप करण्याचा दोघा जणांनी केलेला प्रयत्न फसला आहे.

By

Published : Aug 20, 2019, 9:38 PM IST

Published : Aug 20, 2019, 9:38 PM IST

जिल्हा परिषद जालना

जालना- जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून सहा धनादेश चोरीला गेले होते. या धनादेशांच्या माध्यमातून ३३ लाख ८६२४ रुपये हडप करण्याचा दोघा जणांनी केलेला प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून मनोज निवृत्ती गायकवाड आणि सुनील सुधाकर रत्नपारखे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जालना जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात किशोर शेजवलकर, सिद्धार्थ पटेकर आणि विजय खापरे हे तिघे कार्यरत आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी हे तिघेही काम करत असताना सहा धनादेश चोरीला गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांना चोरीबाबत कळविले. चव्हाण यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (शिवाजी पुतळा) शाखेला चोरी गेलेल्या धनादेशाचे क्रमांक देऊन ते न वटविण्यासंदर्भात कळविले. त्याचवेळी या विभागातही त्यांनी चौकशी केली असता कोणीच माहिती देण्यास तयार नव्हते.

याच दरम्यान दिनांक १९ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी चोरी गेलेले धनादेश वटविण्यासाठी काहीजण बँकेत आले असल्याचे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला कळविले. त्यानुसार मनोज निवृत्ती गायकवाड यांच्या नावे दि. १४ ऑगस्ट रोजी ९५ हजार ८२४ रुपये आणि २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा धनादेश सुनील सुधाकर रत्नपारखे यांच्या नावाने आला असल्याचे सांगितले.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन या धनादेशाची खात्री केली. त्यावरून धनादेशावर लिहिलेला मजकूर जि.प कर्मचाऱ्यांचा नसल्याचे कळले. तसेच त्यावरील सही देखील लेखा व वित्त अधिकाऱ्यांची नसून बनावट असल्याचे आढळून आले. यावरून हे सहा धनादेश मनोज निवृत्ती गायकवाड व सुनील सुधाकर रत्नपारखे या दोघांनी लबाडीने जिल्हा परिषद कार्यालयातून चोरून नेले, तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेमार्फत वटविण्याचे प्रयत्न केले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण धोंडीराम निर्मळ यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून मनोज निवृत्ती गायकवाड आणि सुधीर सुधाकर रत्नपारखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details