महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारा छावण्यांचा प्रश्न बिकट, अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संघटना निवडणुकीत मग्न

जालना जिल्ह्यात चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात फक्त २ छावण्या सुरु झाल्या आहेत.

चारा छावण्यांचा प्रश्न बिकट, अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संघटना निवडणुकीत मग्न

By

Published : Apr 17, 2019, 8:35 PM IST

जालना- जिल्ह्यात चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात फक्त २ छावण्या सुरु झाल्या आहेत. त्याही १६ एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात १७ प्रस्ताव आले होते. त्यापैकी फक्त २ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित १५ प्रस्ताव हे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, ते अद्यापपर्यंत पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी आलेले नाहीत.

जिल्हात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, भायगव्हाण आणि त्याच कारखान्याच्या मौजे अंकुश नगर तालुका अंबड येथे अशा एकूण २ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, उर्वरित १५ चारा छावण्या अधिकार्‍यांच्या आणि संबंधित प्रस्तावित संस्थेच्या दिरंगाईमुळे सुरू झाल्या नाहीत. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुचित केले आहे. मात्र, दीड महिना झाला तरीदेखील या कागदांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. यामध्ये विशेष करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देण्याची इच्छा असूनही खालच्या थरातील अधिकारी आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना देखील कोणत्याही हालचाली न करता निवडणुकीमध्ये मग्न असल्यामुळे चारा छावण्या उभारणीस विलंब होत आहे. पर्यायाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details