महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीनंतरच शाळा सुरू होतील; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यात शहरीभागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे दिवाळीपर्यंत तरी शाळा सुरू होणार नाहीत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

By

Published : Sep 17, 2020, 9:19 PM IST

जालना - शिक्षणाच्या अधिकारांतर्गत ज्या शाळांचे शासनाकडे पैसे थकले आहेत, त्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ठोस उत्तर न देता लवकरच देऊ, असे म्हणत वेळ मारून नेली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवाळी होईपर्यंत शाळा सुरु होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

जालना जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी शाळांमधून प्रवेश देण्यात आले आहेत. अशा प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांची फी ही सरकारमार्फत संबंधित शाळांना दिली जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा निधीच शाळांना मिळालेला नाही. त्यामुळे या शिक्षण संस्था चालवायच्या कशा? हा मोठा पेच संस्थाचालकांचे समोर आहे. त्यातच सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनाही फी भरण्यासाठी तगादा लावू नये, अशा सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्थाचालक अडचणीत सापडले आहेत.

गुरुवारी (दि.17 सप्टें.) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या जालना जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी ईटीव्ही भारतने या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता हा निधी लवकरच उपलब्ध केला जाईल, असे सांगितले. तसेच आज जालना जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये किती शाळांची किती देणे बाकी आहे याबाबत आढावा घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपर्यंत नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून निर्णय घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता विद्यार्थी आपापल्या घरी सुरक्षित आहेत आणि राहतील. त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी शाळा सुरू न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाच -मराठवाड्यावर संतांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी पाठिशी ठेवावी - मंत्री राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details