जालना - एका 60 वर्षीय महिलेचा 'सारी' या आजाराने मृत्यू झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या महिलेचा मृत्यू 'सारी' ने झाला नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिला आहे. मंठा तालुक्यातील एक महिला सर्दी, ताप, या आजारामुळे 8 एप्रिलला जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती झाली होती. त्यानंतर तिचा काल (14 एप्रिल) मृत्यू झाला होता.
जालना शहरामध्ये महिलेला भरती करून प्राथमिक तपासणी केल्यानंतर न्यूमोनियाचे लक्षणे दिसली. त्यामुळे या रुग्णालयातून या महिलेला शासकीय रुग्णालयात पाठविले. इथे भरती झाल्यानंतर रुग्णालयाने या महिलेचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. तो अहवाल देखील निगेटिव्ह आला. त्यानंतर दोन दिवस इथे उपचार घेतल्यानंतर परत या महिलेच्या नातेवाईकांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले होते. मात्र, या रुग्णालयात भरती होण्यापूर्वीच त्या डॉक्टरांनी महिलेसाठी लागणाऱ्या सुविधा या शासकीय रुग्णालयात आहेत, त्यामुळे त्या महिलेला पुन्हा सरकारी दवाखान्यात पाठविले.