जालना- " भज गोविंदम भज गोपालम् आनंदी स्वामी महाराज की जय" या जयघोषात आनंदी स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा पार पडला. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक आज पहाटेपासूनच जालन्याचे प्रतिपंढरपूर, म्हणजे आनंदी स्वामी महाराज यांच्या दरबारात हजर झाले.
सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आनंदी स्वामी महाराजांची पालखी मंदिराच्या बाहेर निघाली. पालखी सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते झाले."जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटता" या अभंगाप्रमाणे पंढरीला जाण्याचे हे सुख अनेकांच्या नशिबी नाही. मात्र,त्यांना निराश न होऊ देता स्वतः पांडुरंग त्यांच्या दरबारात आल्याचे चित्र आपल्याला जालन्यात आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्या निमित्ताने पहायला मिळते. दत्तात्रयाचा अवतार घेऊन पांडुरंग देऊळगाव राजा येथील तिरुपती बालाजी मंदिरात प्रगट झाले. आणि ते कालांतराने जालण्यात स्थिरावले. अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. त्यावेळेपासून प्रतिपंढरपूर म्हणून जालन्यातील हे देवस्थान परिचित आहे.