बदनापूर (जालना) - येथील तहसील कार्यालयात आरोग्य विभागामार्फत येणाऱ्या–जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येते. यासाठी आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी येथे येतात. पीपीई किट घालून ते तपासणीसाठी स्वॅब संकलित करतात. मात्र, जाताना ते कर्मचारी पीपीई किट येथेच उघडयावर टाकून निघून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे थेट गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तहसील परिसरात उघड्यावर टाकल्या पीपीई किट; बदनापुरातील प्रकार
जालन्यातील बदनापूर तहसील परिसरात उघड्यावर पीपीई किट आढळल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बदनापूर तहसील कार्यालयात येणाऱ्यांचे कोरोना तपासणी करण्यात येत आहे. कोरोना निवारणार्थ प्रशासनाने स्तुत्य उपक्रम राबवलेला असताना यावेळी कोरोना स्वॅब घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मात्र कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी काम संपल्यानंतर पीपीई किट तहसील परिसरातील कचऱ्यात टाकून दिली. आज (शुक्रवारी) ही घटना उघडकीस आली. यामुळे तहसील परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण होते.
दरम्यान ही बाब आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी ही पीपीई कीट उचलून नेली. याबाबत बदनापूर तहसीलदार यांना अनिल ढवळे, काकासाहेब भालेराव आणि गणेश बरसे या नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालयात कचरा आणि पीपई किट पडलेल्या आहेत. तहसील कार्यालयात पाच दिवसांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाची तपासणी करत आहेत. तरी संबंधित कर्मचारी पीपीई कीटचा वापर झाल्यानंतर ती कीट तहसीलच्या परिसरातच फेकून देण्यात येते. त्यामुळे तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करून जे लोक उघड्यावर पीपीई कीट टाकून सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.