जालना - शहरापासून 25 किलोमीटरवर अंतरावर अंबड हे गाव आहे. गावालगतच देव माशाच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराच्या कपारीतमध्ये तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूरही देवीची तीन पीठे आणि सप्तशृंगीचे अर्धपीठ अशा साडेतीन पीठांचे वास्तव्य आहे. माशासारखा आकार असलेल्या डोंगराच्या कपारीत ही तिन्ही पिठे एकत्र असल्यामुळे या देवीला मच्छ आणि उदरी म्हणजेच माशाच्या पोटातील देवी म्हणजे 'मत्स्योदरी' असे नाव पडले.
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे तिन्ही देवीच्या रूपाचे 3 तांदळे आपल्याला येथे पाहायला मिळतात. असे सांगण्यात येते की, मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली आणि त्यामधून या देवी येथे प्रकट झाल्या. या देवींची कोणीही स्थापना केलेली नाही. नवसाला पावणारी देवी अशी देखील लोकांची धारणा आहे. उंच डोंगरावर वसलेल्या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना पायर्या चढून जावे लागते. सातव्या माळेला या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. सातव्या माळेला रात्रीच्या अतिषबाजीनंतर आठव्या माळेला रात्री बारा वाजता होम हवनला सुरुवात होते. याची पूर्णाहुती नवव्या माळेला सकाळी सहा वाजता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पूर्ण होते. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघनासाठी नवीन तहसील कार्यालयापासून जुन्या तहसील कार्यालयमार्गे शहरातील नागरिक देवी मंदिरापर्यंत येऊन सीमोल्लंघन करतात.