महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावरील भगवा राहणार की जाणार, जालन्याच्या राजकारणात अनिश्चितता

अर्जन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते. पण, युती झाल्याने त्यांची ही इच्छा अर्धवट राहण्याची शक्यता आहे.

अर्जुन खोतकरांचा बंगला

By

Published : Feb 26, 2019, 12:22 PM IST

जालना - पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी सध्या जालना जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकरांना उमेदवारी हवी होती. पण, ही जागा भाजपला गेल्यामुळे खोतकर नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खोतकरांच्या दर्शना नावाच्या बंगल्यावर भगवा ध्वज फडकत असतो. पण, आगामी काळात हा ध्वज असाच फडकत राहील की त्याजागी दुसरा झेंडा येईल याबद्दल अजून अनिश्चितता आहे.

अर्जुन खोतकर पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मराठा बिल्डिंगमध्ये राहत होते. हळूहळू त्यांचा व्याप वाढत गेला आणि त्यांनी जुन्या जालन्यातील भाग्यनगर येथे आलीशान बंगला बांधला. या बंगल्यावर फडकत असलेला भगवा ध्वज हे सर्वांचे आकर्षण राहिलेला आहे. त्याचसोबत वारकरी संप्रदायाचे दैवत असलेला पांडुरंगदेखील बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. मात्र, आता त्यांच्या बंगल्यावरील भगव्या ध्वजाचा रंग आता फिकट झाला आहे. त्यामुळे हा ध्वज बदलून तिथे परत भगवाच लागेल, की कुठला वेगळा ध्वज पहायला मिळेल याबद्दल लोकात उत्सुकता आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात खोतकरांनी लढण्याची तयारी केली होती. पण, ऐनवेळी युती झाल्याने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची नाराजी उघड बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे या पेचावर निर्णय देत नाहीत. तसेच, काँग्रेसमध्ये प्रवेश करावा तर जिल्हा काँग्रेसमधून खोतकरांना घेण्यास विरोध होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे खोतकरांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. ते खोतकरांच्या प्रवेशाला आडकाठी आणत आहेत, असे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात आयुष्मान भारतचे कार्डवाटप करण्याचा घाट रावसाहेब दानवे यांनी घातला आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदाराला बोलावणे आवश्यक असते. त्यामुळे खोतकरांना बोलावणे क्रमप्राप्त आहे. पण, खोतकर कार्यक्रमाला जातील याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला कार्यक्रमाला आणण्याची योजना आखली जात आहे. जेणेकरून खोतकरांना येणे आवश्यक होईल. आता दानवेंची ही खेळी यशस्वी होणार का आणि खोतकर याला काय प्रतिसाद देतात यावर जालन्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details