जालना- कोरोनासाठी विशेष भरती केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरच हे कर्मचारी निवेदनाचे कागद हातात घेऊन फिरत आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत या कर्मचाऱ्यांचे पगार होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कार्यरत आहेत हे कर्मचारी
जालना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मिशन अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. सहा महिन्यांमध्ये दोन वेळा पगार थकल्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा पगार झालेला नाही. त्यातच दिवाळी तोंडावर आल्यामुळे खर्चही वाढलेला आहे. म्हणून दोन्ही महिन्याचे पगार त्वरित करावेत, यासाठी हे कंत्राटी कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद अशा तीन विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी फिरत आहेत.