जालना -कापसावरील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईपोटी अनुदान देण्यात आले. या अनुदानाच्या वाटपात अनियमितता करणाऱ्या तलाठ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सन 2017-18 मध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी जालना तालुक्यातील आठ तलाठ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा...मुख्यंत्र्यांनी 'नाणार'वर बोलणं टाळलं, शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे यांनी दिनांक 22 मे 2019 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना अर्ज देऊन संबंधित तलाठ्यांच्या गैर कारभाराबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी जालना तहसीलदारांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल दिनांक 11 फेब्रुवारी 20 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. अहवालावरून 8 तलाठ्यांनी अनुदान वाटपात गंभीर स्वरूपाची अनियमितता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे तहसीलदारांनी म्हटले आहे.