जालना -भोकरदन शहरातील नागरिकांना भाजीपाला आणि फळे घेण्यासाठी आता घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. भाजीपाला आणि फळविक्रेते शहरातील प्रत्येक भागात विक्रीसाठी फिरणार आहेत. तशा सूचना भोकरदन नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी सदर विक्रेत्यांना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर बाहेर पडू नये. घरातच बसून काळजी घ्यावे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये, यासाठी नगरपरिषदेकडूनच आता प्रयत्न केले जात आहे.
भोकरदन नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...कोरोना अपडेट : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; जालन्यात 11 दुकानदारांवर कारवाई
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. शहरातील सिल्लोड नाक्याजवळील भाजी मंडी येथे नागरिक खरेदीसाठी जमाव करत आहेत. त्यामुळे या संचारबंदीचा काहीही फायदा होत नसून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशा तक्रारी काही नागरिकांनीच व्यक्त केल्या होत्या.
मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी भाजीमंडीला प्रत्यक्ष भेट देऊन, प्रत्येक भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील एक-एक भाग वाटून दिला. त्यानुसार विक्रेत्यांनी भाजीमंडीत आपली दुकाने न मांडता, वाटून दिलेल्या संबंधीत भागात घरोघरी फिरून विक्री करावी, अशा सूचना दिल्या आहेत.