साडेनऊ लाखांचा धनादेश हरवल्याचा बनाव करून ग्रामविकासनिधीत अपहार, सरपंचासह ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणाची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणाची चौकशी केली. ग्रामसेवकाचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.
जालना - परतूर तालुक्यातील बाबुलतारा या गावच्या ग्रामसेवकाने आणि सरपंचाने संगनमत करून शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून काम करण्यासाठी आलेल्या साडेनऊ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप या दोघांवर आहे. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात या गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत मार्फत विकास कामे करण्यासाठी बाबुलतारा ग्रामपंचायतला लाखो रुपयांचा निधी आला आहे. या निधीमधून साडेनऊ लाख रुपयांचा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव करून हा निधी गावातीलच खासगी व्यक्ती विष्णू ज्ञानदेव मुळे यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. या प्रकरणाची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी हा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरून आरोरा यांनी परतूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना बाबुलतारा ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ग्रामसेवक आर. एस. बोर्डे यांच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा नोंद होताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला निलंबितही केले आहे.