जालना - मागील ७० वर्षांपासून महाराष्ट्रावर दोनशे घरांचेच राज्य चालू आहे. या प्रस्थापितांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी आंबड येथे म्हटले आहे.जालना लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, ठराविक घराण्यांनीच शासन चालवावे असे नाही. गेल्या ७० वर्षांपासून घराणेशाही चालू आहे. यामध्ये जावयाच्या, मुलाचा समावेश करून घेऊन आपली सत्ता टिकून ठेवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये २०० घराण्याचीच सत्ता आहे. या प्रस्थापितांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठीच बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केली आहे. वंचित आघाडी, ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. मात्र, ज्यांनी गेल्या ७० वर्षांपासून वंचितांना वापरून घेतले. त्यांच्या मतावर निवडून आले, वंचितांना कधीही सन्मान दिला नाही, असेच या आघाडीच्या विरोधात आहेत, असे ते म्हणाले.