जालना - साहित्य क्षेत्रात 'वाल्मिकी' म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा यांचे स्मारक व्हावे, या मागणीसाठी जालन्यात काल (सोमवार)आंदोलन करण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रातील विविध कलाकारांनी एकत्र येऊन 'गीत काव्य जागर आंदोलन' केले.
जालन्यात 'गीत काव्य जागर आंदोलन' आंदोलन करण्यात आले 43 वर्षांपासून स्मारकाच्या प्रतीक्षेत -
गदिमांचे स्मारक व्हावे ही गेल्या त्रेचाळीस वर्षांपासूनची मागणी आहे. त्यांची काल 43वी पुण्यतिथी होती. मात्र, सरकारने अद्याप या स्मारकाच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. पुण्यामध्ये गदिमांच्या स्मारकासाठी जागा दिलेली आहे. मात्र, त्याजागेवर बांधकामासाठी परवानगी मिळत नाही. एका महान साहित्यिक, कवी, पटकथा-संवाद लेखका याचे स्मारक होऊ नये ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे जालना शहरातील चित्रकार, मूर्तीकार, गीतकार, साहित्यिकांनी एकत्र येऊन 'गीत काव्य जागर आंदोलन' केले. या आंदोलनामध्ये कोणाचाही निषेध केला नाही. मात्र, सरकारने स्मारक पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
आज झालेल्या या आंदोलनामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, अरुण घोडे, पंडित लवटे, चित्रकार मुकुंद दुसे, संतोष जोशी, अरविंद देशपांडे, मूर्तीकार संजय गोधेकर, संगीत क्षेत्रातील नादब्रह्म संगीत मंचच्या नेहा दंडे, विशाखा नाईक, मंजुषा मेगडे, अजिंक्य दंडे यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाला शहरातील नागरिकांनीही पाठिंबा दिला.
गदिमांचा परिचय -
ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर) यांचे नाव माहित नाही, असा व्यक्ती सापडणे कठीणच आहे. कवी, पटकथा लेखक, संवाद लेखक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गदिमांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 ला त्यांच्या आजोळी शेटफळे या गावी झाला. त्यांचे बालपण माडगुळे या त्यांच्या मूळ गावी गेले, त्यामुळे ते माडगूळकर झाले. वयाच्या सोळाव्या- सतराव्या वर्षीच त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. गदिमांची 'गीत रामायण' ही रचना अजरामर आहे. यासोबत त्यांनी बालगीतांच्या माध्यमातून देखील बालकांच्या मनात आपले नाव करून ठेवले आहे. त्यांची 'झुक झुक झुक झुक आगीनगाडी' आणि 'गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण' ही बालगीते आजही लहान मुलांना शिकवली जातात. भक्तिगीत ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये गदिमांच्या 'विठ्ठला तू वेडा कुंभार' या रचनेचे स्वर घुमल्याशिवाय राहत नाहीत. तर 'सैनिक हो तुमच्यासाठी' आणि 'जिंकू किंवा मरू' हे समरगीत देखील सैनिकांसह सामान्य नागरिकांनाही देशभक्तीचे वेड लावून जाते.