जालना - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जालनेकरांसोबत लपंडाव सुरू आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता चार जवानांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालामध्ये सामान्य रुग्णालयात बाहेर रुग्णांची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जालन्यातील कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 13 वर गेली आहे.
बाह्य रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १३ वर
जिल्ह्यात गुरुवारी ४ जवानांना रुग्णलयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर, संध्याकाळी बाह्य रुग्णांची तपासणी करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.
6 एप्रिल रोजी जालन्यात कोरोना संसर्ग झालेली पहिली महिला रुग्ण निष्पन्न झाली होती. या महिलेचा 13 एप्रिल रोजी 5 वाजता अहवाल निगेटिव्ह आला आणि आणि सहा वाजता परतूर तालुक्यातील महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर 30 एप्रिल रोजी परतूरच्या महिलेला दुपारी बारा वाजता सामान्य रुग्णालयातून सुट्टी दिली आणि सायंकाळी भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय तरुणीचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा असे झाले आहे की, गुरुवारी दुपारी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा सायंकाळी दुसऱ्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसचे गुरुवारी अनेक रुग्णांची तपासणी करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, या डॉक्टरने किती रुग्णांची तपासणी केली हे तपासणे आता आरोग्य विभागापुढे आव्हानच आहे.