जालना -बदनापूर तालुक्यातील परतीच्या पावसाने पिकाची अतोनात हानी झालेली असून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यानंतर तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी विविध गावातील शेतीला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शेतीत पाणी साचलेले असल्यामुळे व वस्तुनिष्ठ परिस्थिती दिसावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करून नुकसानीची पाहणी करण्यात आली.
हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींना भेटणार; सोमवारी राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता
बदनापूर तालुक्यात यंदा मान्सूनचा अत्यल्प पाऊस पडला होता. त्यानंतर पडलेल्या थोड्याफार पावसावर कशीबशी खरीप पिके आली होती. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिके सोंगणी (कापणी) करुन काढणीस शेतात ठेवली होती. असे असतानाच पावसामुळे सर्व पिके वाहून गेली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळेसच शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज शनिवारी बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी तालुकयातील खामगाव, दाभाडी, चिखली व चणेगाव या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.