जालना - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जालना शहरात रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी कोरनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. याला पोलीस प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.
जालन्यात रविवारपासून पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे गेल्या महिन्यात जालना शहरात सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेवटचा उपाय म्हणून 5 जुलैच्या(रविवार) मध्यरात्रीपासून दहा दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. या संचार बंदीच्या पाचव्या दिवशी जालना शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असल्याचे समोर आले. गुरुवारी 11 तर आज आठ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मात्र, बाधितांची संख्या घटली असली तरी मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला, असे म्हणता येणार नाही.
शहरातील नवीन जालना भागात सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही सर्व क्षेत्र येत असल्यामुळे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे सध्या तारेवरची कसरत करत या सर्व प्रतिबंधित क्षेत्रांवर लक्ष ठेवून आहेत. जालनाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मामा चौकातदेखील कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवीन जालन्यात जाण्यासाठी किंवा नवीन जालन्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी मामा चौकाचा वापर करावा लागतो. या ठिकाणाहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. यावेळी संचारबंदीची एकदम कडक अंमलबजावणी करण्यात आली असून नागरिक देथील चांगला प्रतिसाद देत असल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले.
संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्येत झालेली घट (कंसामध्ये त्या दिवशीपर्यंतचा मृतांचा आकडा)
रविवार 5 जुलै - 34 (23)
सोमवार 6 जुलै - 56 (27)
मंगळवार 7 जुलै - 0 (28)
बुधवार 8 जुलै - 13 (34)
गुरुवार 9 जुलै - 11 (35)
शुक्रवार 10 जुलै - 08 (37)
जालन्यात 5 जुलै रोजी एकूण 719 कोरोनाबाधित होते. त्यामध्ये पाच दिवसात 141 रुग्णांची वाढ होऊन ही संख्या 860 वर गेली आहे. रविवारी मृतांचा आकडा 23 होता तो वाढवून 37 पर्यंत पोहोचला आहे.