जालना - आमदार राजेश टोपे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे आज अनेकांनी या जागेसाठी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या.
घनसावंगी आणि अंबडमध्ये लोप पावत चाललेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. घनसावंगीची जागा काँग्रेसला मिळेल, या आशेवर अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. तसेच औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आजच्या या मुलाखतींमध्ये घनसावंगीसह अंबड मध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी घनसांगी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून येथे टोपे घराण्याने साखर कारखाने ,शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपला पगडा निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांना मतदान करणारा मोठा वर्ग येथे आहे. मात्र, ४ दिवसापूर्वी टोपे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या आणि यासंदर्भात टोपे यांनी जरी खुलासा केला असला तरी या चर्चेला अजून पूर्णविराम मिळालेला नाही. त्यातच आज काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतींसाठी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते प्रभाकर पवार यांनी उपस्थिती लावून मुलाखत दिली. ते घनसांगी तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तसेच जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. याचसोबत कृषी उत्पन्न बाजार समिती अंबडचे माजी सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे निश्चितच काँग्रेसच्यावतीने देखील या मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी आता दिसायला लागली आहे.
घनसांगीची जागा कुणाला सुटेल हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र, याठिकाणी आम्ही तयारी करीत आहोत, असे सूचक विधान काँग्रेसचे पक्ष निरीक्षक टी. पी. मुंडे यांनी केले. त्यामुळे आता जालना जिल्ह्यातील परतूर आणि जालना या विधानसभेवर काँग्रेसचा असलेला हक्क वाढवून आता पाचही विधानसभा मतदार संघाच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसेच वेळ पडली तर भोकरदन आणि बदनापूर देखील काँग्रेस स्वबळावर लढू शकेल, अशी परिस्थिती काँग्रेस तयार करीत आहे.