जालना - खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांकडून मर्यादेपेक्षा जास्त फी आकारली तर मेस्मा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिला. ते जालना येथे बोलत होते.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना योग्य सेवा देत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. या अनुषंगाने आरोग्यमंत्री टोपे यांनी सामान्य रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) डॉक्टर्सची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
हेही वाचा -राज्यात आज साडेसहा हजार नव्या रुग्णांची भर, १९३ जणांचा मृत्यू
दरम्यान, शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांच्याकडून अवाढव्य फी वसूल केली जात आहे. प्रत्येक डॉक्टर वेगवेगळे खर्च सांगत आहेत. तसेच रुग्णाची तब्येत गंभीर झाल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात भरती करण्यासाठी पाठविले जात होते. यामुळेच मृत्यूदर वाढला अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तसेच रुग्ण बरे न होण्याचे आणि मृत्यूदर वाढल्याचे खापर सरकारवर फोडण्याचा डॉक्टर मंडळीचा प्रयत्न होता. यामुळे यावेळी आरोग्यमंत्री चांगलेच संतापले होते. यामुळे खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांकडून मर्यादेपेक्षा जास्त फी आकारली तर मेस्मा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयएमएचे डॉक्टर्स उपस्थित होते.