जालना- शहरात शिवसेनेच्या वतीने बुधवारी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम विकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. युवासेनेच्या या कार्यक्रमात मात्र मंत्री सत्तार यांच्या टोपीचा किस्सा चांगलाच चर्चेला आला होता. सत्तार यांच्या डोक्यावरची टोपी उतरवण्यासाठी शिवसैनिकांनी आता तयारीही सुरू केली आहे.
या कार्यक्रमावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, युवा सेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर .आदी मान्यवरांची देखील यावेळी उपस्थिती होती.
टोपीचे रहस्य-
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी लोकसभा लढविण्याची तयारी केली होती. आयत्या वेळी खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत जुळते घेत त्यांनी माघार घेतली होती. त्याबदल्यात विधानसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांना मदत करणार होते. मात्र ती न केल्याने अर्जुनराव खोतकर यांचा पराभव झाला. हा पराभव अब्दुल सत्तार यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी "जोपर्यंत खासदार दानवे यांना पाडत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढत नाही "असा पण केला. त्यामुळे सत्तार यांच्या डोक्यावरची टोपी काढण्यासाठी खासदार दानवे यांना पाडणे गरजेचे आहे आणि त्यांना पाडण्यासाठी अर्जुन खोतकर यांना निवडून आणणे देखील गरजेचे आहे. म्हणून मंत्री अब्दूल सत्ताराच्या डोक्यावर टोपी आहे.