जालना- १७ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारभारी अंभोरे यांचे उपोषण सुरू होते. उपोषणाच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश धुडकावला आणि सुमारे 40 कार्यकर्त्यांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
जालन्यात उपोषणस्थळी 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल; जमावबंदीचा आदेश धुडकावला
पुणेगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कारभारी अंभोरे यांनी 5 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश धुडकावला आणि सुमारे 40 कार्यकर्त्यांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पुणेगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कारभारी अंभोरे यांनी 5 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाने मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी वेगळेच वळण घेतले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या वादामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सुभाष देठे यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, तो कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे फसला. यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि उपोषणकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. या सर्व प्रकरणानंतर रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल प्रताप हरसिंग जोनवाल यांनी तक्रार नोंदविली.
या तक्रारीमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सुभाष देठे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय कदम यांच्यासह उपोषणकर्ते कारभारी अंभोरे त्यांची पत्नी कृषीवार्ता कारभारी अंभोरे, गंगाराम आंबोरे, संतोष उगले, परमेश्वर उगले, अशोक उजेड आदी 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवि कलम 143 आणि 135 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.