जळगाव- ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शहरातील आहुजा नगर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. सौरभ गोपालदास मनवानी (वय १९, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याच दुचाकीवरुन सौरभ आणि त्याचा मित्र प्रवास करत होता सौरभ हा धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. तो भुसावळ येथून अपडाऊन करत होता. बुधवारी साडेचार वाजताच्या सुमारास तो हर्षल शांताराम सपकाळे (रा. जळगाव) या मित्रासोबत दुचाकीवरून महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी शहरात येत होता. सौरभ दुचाकीवर मागे बसलेला होता. शहरातील आहुजा नगर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने मागून कट मारला. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या सौरभच्या मित्राचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सौरभ रस्त्यावर पडला व ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला.
यावेळी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तालूका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सौरभचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या अपघातात सौरभचा मित्र हर्षल सपकाळे देखील जखमी झाला आहे. मृत सौरभचे वडील भुसावळात सुका मेवा विक्रीचे दुकान चालवतात. या घटनेची माहिती होताच त्यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला होता.
महामार्गावरील अपघातांची मालिका थांबेना
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा अतिशय धोकादायक झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साईड पट्ट्या खोल झाल्याने सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय प्रलंबित असल्याने महामार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे. वारंवार पाठपुरावा करूनही हा विषय मार्गी लागत नसल्याने प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी विरोधात जनक्षोभ वाढला आहे.