जळगाव - गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे, रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कृषी विभागाकडून प्राथमिक पंचनाम्याचे अहवाल पूर्ण झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 30 ते 35 गावांमधील सुमारे 710 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -जळगावमध्ये पुन्हा सुरू होणार मका खरेदी; केंद्र सरकारकडून दिलासा
जळगाव तालुक्यासह भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेरस, तसेच धरणगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मक्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे रब्बीच्या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरभरा आणि मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, अजून काही दिवस असेच वातावरण राहिले तर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने गव्हाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.
तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका -
अवकाळी पाऊस आणि वादळाचा जिल्ह्यातील तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यात अमळनेर, जळगाव आणि चाळीसगाव तालुक्याचा समावेश आहे. एकट्या अमळनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, या ठिकाणी 680.10 हेक्टरवरील पिके हातून गेली आहेत. अमळनेर तालुक्यातील 15 ते 20 गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सर्वाधिक नुकसान गव्हाच्या पिकाचे झाले आहे. 262.10 हेक्टरवरील गव्हाचे पीक वाया गेले आहे. त्या खालोखाल 221 हेक्टरवरील हरभरा देखील जमीनदोस्त झाला आहे. 171 हेक्टरवरील मक्याचे पीक देखील जमिनीवर आडवे झाले आहे. 25 ते 30 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकालाही फटका बसला आहे. अमळनेर तालुक्यातील 2 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात नमूद केला आहे, अशी माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.