जळगाव - गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी 8च्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बॅरेजवर घडली. हिरतसिंग जगतसिंग पवार (वय 40) व त्यांचा पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे वरखेडे येथील रहिवासी होते.
नेमकी घटना काय?
हिरतसिंग पवार हे एसटी महामंडळात नोकरीला होते. ते पुण्यात सेवारत होते. सध्या ते घरी वरखेडे येथे आलेले होते. मृणालचे वडील इंद्रसिंग जगतसिंग पवार हे देखील एसटी महामंडळाच्या नंदुरबार आगारात कार्यरत आहेत. शाळांना सुटी असल्यामुळे मृणाल हा नंदुरबार येथून आजी-बाबांकडे आलेला होता. मंगळवारी सकाळी हिरतसिंग आणि मृणाल हे पोहण्यासाठी वरखेडे बॅरेजवर गेलेले होते. त्याठिकाणी मृणाल याने खोल पाण्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडायला लागला. हे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी मृणालला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र जास्त पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
वरखेडे गावावर शोककळा
या घटनेमुळे वरखेडे गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांना दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.