जळगाव - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे चुलत भाऊ जागीच ठार झाले. ही घटना आज (शनिवार) रात्री जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. पोलिसांनी आरोपी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भावांचा जागीच मृत्यू
वैभव जीवन भिरुड (वय २०) आणि हेमंत उर्फ आकाश जीवन भिरुड (वय २७) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते रावेर तालुक्यातील सावदा गावाचे रहिवाशी होते. वैभव आणि हेमंत कामानिमित्त जळगावात आले होते
वैभव जीवन भिरुड (वय २०) आणि हेमंत उर्फ आकाश जीवन भिरुड (वय २७) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते रावेर तालुक्यातील सावदा गावाचे रहिवाशी होते. वैभव आणि हेमंत कामानिमित्त जळगावात आले होते. जळगाव येथून ते दुचाकीने घरी परत असताना नशिराबादजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघातात ठार झालेला हेमंत भिरूड याचा नुकताच साखरपुडा झाला होता. येत्या 20 एप्रिलला त्याचा विवाह होणार होता. अंगाला हळद लागण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हेमंत रेल्वे कर्मचारी होता. वैभव हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.