जळगाव- शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या घरात रंगलेला पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला. मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रात्री पावणे बारा वाजता पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १२ जुगारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात संबंधित नगरसेवकाला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या घरात जुगाराचा डाव रंगला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यानुसार, रोहन यांनी पोलीस कर्मचारी किरण धमके, सुनील पाटील, राजेश चौधरी, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे, सचिन साळुंके, विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांना सोबत घेत या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी संतोष भगवान बारी (वय 26 वर्षे, रा. पिंप्राळा), रघुनाथ देवसिंग पाटील (वय 45 वर्षे, रा. पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (वय 30 वर्षे, रा. पिंप्राळा), पंकज सुरेश पाटील (वय 30 वर्षे, रा. शिवकॉलनी), सचिन रघुनाथ पाटील (वय 26 वर्षे, रा. मयूर कॉलनी), नीलेश लोटन कोळी (वय 30 वर्षे, मयूर कॉलनी), धिरज विजय पाटील (वय 45 वर्षे, रा. गुजराल पेट्रोल पंप), राजेंद्र भिका भोई (वय 30 वर्षे, रा. मयूर कॉलनी), मंगेश लक्ष्मण पाटील (वय 27 वर्षे, रा. मयूर कॉलनी), पंकज विरभान पाटील (वय 30 वर्षे, रा. मयूर कॉलनी), कुणाल श्याम रामसे (वय 20 वर्षे, रा. मयूर कॉलनी) व अनिल सुरेश गव्हाळे (वय 46 वर्षे, रा. मयूर कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्यांच्याकडून 12 मोबाईल, 3 दुचाकींसह एकूण 2 लाख 74 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळण्यासाठी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या ताब्यातील घर असल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले.
हेही वाचा -सुबक रांगोळी साकारत 'कोरोना वॉरियर्स' प्रति जळगावातील युवा अभियंत्याची कृतज्ञता!