जळगाव- लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यामुळे भाजप खासदार ए.टी. पाटील हे बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. तिकीट कापण्याची धमकी देऊन माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.
तिकीट कापण्याची धमकी देत माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले; ए.टी. पाटलांचा गौप्यस्फोट
तिकीट कापण्याची धमकी देत मंत्री महाजनांनी माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले... महाजनांचे नाव न घेता जळगावात खासदार ए .टी. पाटीलांचा गौप्यस्फोट... म्हणाले माझ्या नावावरे बीएचआर पतसंस्थेकडून यांनी १ कोटी उचलले
खासदार ए.टी. पाटील म्हणाले की, गेल्या काळात माझ्या नावावर यांनी बीएचआर पतसंस्थेकडून काही पैसे उचलले होते. त्यानंतर पक्षातील मोठ्या व्यक्तींकडून सांगण्यात आले की, 'नाना त्यांचे पैसे देऊन टाका'. मी त्याच काळात एक कोटी रुपये दिले होते. तसचे परवा पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्याकडे ७५ लाख रुपये होते. मी घरातून २५ लाख रुपये घेऊन गेलो आणि एक कोटी रुपये देऊन टाकले. ते पैसे देण्यासाठी मला तिकिटाच्या संदर्भात चुकीचे होईल, अशी भीती दाखवली होती. त्यामुळेच मी ते पैसे तत्काळ देऊन टाकले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
भाजपमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर-
खासदार पाटील यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहाराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यासंदर्भात कोणीही जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली नव्हती. परंतु, आता खासदार पाटील यांनी मेळाव्यात जाहीरपणे या व्यवहाराची वाच्यता केल्याने 'पार्टी विथ डिफरंन्स' असं बिरुद मिरवणाऱ्या भाजपमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे.