जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. ७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.
विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्याचा पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश अनिवार्य असून २० ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यार्थ्याचा या अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असावा. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ते विद्यार्थी परिषद निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत आचारसंहितेचा कालावधी राहणार आहे.
विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम असा-
९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. सायंकाळी ४ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध होईल. ११ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार यादीवर आक्षेप प्राचार्यांकडे नोंदवता येतील. त्याच दिवशी ४ वाजता प्राचार्यांनी आलेले लेखी आक्षेप विद्यापीठ निवडणूक कक्षाकडे ई-मेलद्वारे पाठवावेत. १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आक्षेपांवर सक्षम प्राधिकरण निर्णय देतील. सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. १३ व १४ सप्टेंबरला सकाळी ११ ते ४:३० या वेळेत विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत नामनिर्देश अर्ज दाखल करता येतील. १५ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल व सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ संकेतस्थळ व सूचना फलकावर वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येतील.
प्राप्त आक्षेपांवर १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता निर्णय दिला जाईल व सायंकाळी ५ वाजता वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. १८ व १९ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरला सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. २३ सप्टेंबरला महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभाग येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होईल व निकाल जाहिर केला जाईल. २८ सप्टेंबरला एनएसएस, क्रीडा, एनससीसी, सांस्कृतिक उपक्रम यातून सदस्यांचे नामनिर्देशन होणार आहे. २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशोब सकाळी ११ ते दुपारी साडेचार या वेळेत सादर करणे आवश्यक आहे.