जळगाव -जम्मू काश्मिरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत जळगाव जिल्ह्यातील एका सुपुत्राला वीरमरण आले. यश दिगंबर देशमुख (वय 21) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. ते चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते.
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांसोबत लढताना जळगावच्या सुपुत्राला वीरमरण
जम्मू काश्मिरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत जळगाव जिल्ह्यातील एका सुपुत्राला वीरमरण आले.
यश हे पॅरा मिल्ट्रीचे जवान होते. ते जून 2019 मध्ये सैन्य दलात रूजू झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची श्रीनगर येथे पहिलीच पोस्टिंग होती. गुरुवारी दुपारी काही दहशतवाद्यांनी श्रीनगरजवळ सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले. यात यश देशमुख आणि उत्तरप्रदेशातील एका दुसऱ्या जवानाचा समावेश आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच शोककळा पसरली आहे.
नुकतेच पूर्ण केले होते प्रशिक्षण-
यश देशमुख हे चाळीसगाव येथील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना, जून 2019 मध्ये पुणे येथे झालेल्या भरतीत सैन्य दलच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे व बेळगाव येथे टप्प्याटप्प्याने सैन्य दलाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मिरात मिळाली होती. सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांना वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच वीरमरण आले. त्यांचे प्राथमिकचे इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण मामांचे गाव असलेल्या रावेर तालुक्यातील निंभोरा येथे झाले. त्यानंतर इयत्ता सातवी ते महाविद्यालयीन शिक्षण चाळीसगाव येथे झाले. सुरुवातीला त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. 12 वी नंतर त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला होता. कला शाखेच्या प्रथम वर्षाला असताना ते सैन्यात दाखल झाले होते.
अद्याप जिल्हा प्रशासनाला माहिती नाही-
जळगाव जिल्ह्यातील जवानाला जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आल्याची अधिकृत माहिती अद्याप जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाही, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, हुतात्मा जवान यश देशमुख यांच्या वडिलांना या घटनेबाबत गुरुवारी दुपारी 4.30 वाजता श्रीनगर येथील सैन्य दलाच्या मुख्यालयातून फोन आला होता. दहशतवाद्यांशी लढताना यश देशमुख यांना वीरमरण आल्याचे सांगण्यात आले होते. हुतात्मा जवान यश यांच्या पश्चात आई सुरेखाबाई, वडील दिगंबर, 2 मोठ्या बहिणी व 1 लहान भाऊ असा परिवार आहे.
पार्थिव शनिवारी मूळगावी येण्याची शक्यता-
हुतात्मा जवान यश देशमुख यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळगावी पिंपळगाव येथे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीनगर येथील सैन्य दलाच्या मुख्यालयातून त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबाद येथे आणले जाईल. त्यानंतर औरंगाबाद येथून वाहनाने पार्थिव पिंपळगाव येथे येईल, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.