जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभारात 3 मेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग व व्यवसाय ठप्प आहेत. बचतगटाच्या महिलांच्या हाताला काम नसल्याने साईधन एंटरप्राईजेसने कापडी मास्क निर्मितीच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, दर्जेदार कापडी मास्क 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
जळगावातील साईधन एंटरप्राईजेस ही संस्था बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. धनंजय कीर्तने आणि अनिता कीर्तने हे संस्थेचे कामकाज सांभाळतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बचतगटाच्या महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधिक फटका अलीकडच्या काळात सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत बचतगटाच्या महिलांसाठी काय करता येईल, या विचारातून कीर्तने दाम्पत्याने पाऊल टाकले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. बाजारात दर्जेदार मास्कचा तुटवडा भासत आहे. म्हणून आपणच मास्क निर्मिती केली तर कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलता येईल, शिवाय बचतगटाच्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल. म्हणून त्यांनी मास्क निर्मिती करण्याचे ठरवले.
100 ते 125 महिलांना मिळाला रोजगार