सोलापूर -गेल्या 34 वर्षांपासून उत्तर-सोलापूर तालुक्यातील अंकोली गावात 50 एकरमध्ये विज्ञानग्राम कार्यरत आहे. वेगवेगळे उपक्रम राबवित या उपक्रमातुन अनेक वैज्ञानिक भारताच्या विविध क्षेत्रात कर्तव्य बजावत आहेत. 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञानग्राममध्ये वीज स्वतः तयार करून वापरणार, अशी भूमिका विज्ञानग्राम प्रमुख अरुण देशपांडे यांनी जाहीर केली. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाची वीज वापरणार नाही, अशी माहिती देत वाढीव वीजबिलांचा निषेध केला. तसेच वीज बिलांची होळी केली. विज्ञानदिनी विज्ञानाचे वेगवेगळे उपक्रम दाखवत वीज कशा प्रकारे तयार करता येते? याबाबत माहिती दिली.
विज्ञानग्राममध्ये बैलऊर्जा प्रकल्प -
अंकोली गावातील विज्ञानग्राममध्ये बैलऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. 30 फुटामध्ये हा लोखंडी प्रकल्प दोन बैलांच्या सहाय्याने चालविला जातो. राज्य शासनाचे वीज कनेक्शन न घेता घरगुती लाईट यामधून उत्पादित केली जाते. 5 एचपी ते 10 एचपीपर्यंतच्या पाण्याच्या मोटारी या बैल उर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेतून उपयोगात आणल्या जातात. दोन खिलार बैलांचा यामध्ये मोठा उपयोग केला जातो. या बैल ऊर्जेच्या विजेच्या भरवशावर विज्ञानग्राममधील राज्य शासनाची वीज स्वतः तोडून वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली.
थर्मोडायनॅमिक प्रकल्प (सायकल ऊर्जा प्रकल्प) -
विजेचे नुकसान कसे होते आणि शासनाची वीज आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत किती प्राप्त होते? याचे उदाहरण थर्मोडायनॅमिक प्रकल्पमधून दाखवण्याचा प्रयत्न अरुण देशपांडे यांनी केला आहे. थर्मोडायनॅमिक म्हणजेच सायकल ऊर्जा प्रकल्पातुन वीज निर्माण केली आणि त्यामध्ये लागणार वेळ व स्वतः केलेले काम यामधून किती वेळ लागतो याचे उदाहरण दाखवले. उदा. शासनाची वीज वापरून पाण्याच्या मोटारमधून एक बादली पाणी जवळपास 50 ते 60 सेकंदाचा अवधी लागला आणि थर्मोडायनॅमिक प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम 23 ते 25 सेकंदात पूर्ण झाले.