जळगाव -प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवारी) पाळधी (ता.धरणगाव) येथे उघडकीस आली. दरम्यान, या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्या तरुणीचा प्रियकर पतीचा देखील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील (रा. पाळधी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
पाळधी (ता. धरणगाव) गावातील आरती भोसले व प्रशांत पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही काही दिवस बेपत्ता झाले होते. ते प्रेमविवाह करून घरी परतले होते. दोघांच्या पालकांनी पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच आरतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. घटनेच्या दिवशी प्रियकर पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्यास जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.