जळगाव -लांबलेला मान्सून व त्यामुळे शेती मशागतीला झालेला उशीर या कारणांमुळे यावर्षी रब्बीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत रब्बी हंगामाची केवळ १८ टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी देखील रब्बीची पेरणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपली होती. त्यामुळे रब्बीची पिके एप्रिल महिन्यापर्यंत काढण्याचे काम सुरू होते. यावर्षी देखील हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीनची पिके पूर्णपणे वाया गेली होती. सप्टेंबर महिन्यातच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून खरीप हंगामाची पिके काढून टाकली होती. मात्र, त्यानंतरही पाऊस कायम राहिल्याने रब्बीसाठी तयारीला उशीर लागला. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागात शेतकरी कापसाच्या फरदडचे (कापसाचा शेवटचा बहार) देखील उत्पादन घेत असतात. यामुळे शेत रिक्त करायला वेळ लागू शकतो. मात्र, काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांकडून शेतातील कापूस काढून फेकला जात आहे. यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रब्बीच्या पेरण्या पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा -उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
हवामान बदलाचा परिणाम -
गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून आता २० जूनपर्यंत दाखल होत आहे. त्यामुळे खरीप हंगाम देखील लांबत आहे. खरीप हंगामाचा सर्वसाधारण कार्यकाळ हा जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचा मानला जातो. कापसाचे पीकदेखील ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत शेतात असते. मात्र, मूग, उडीद, सोयाबीनचा हंगाम जवळपास सप्टेंबरपर्यंतच असतो. हवामान बदलामुळे खरीपचा हंगाम जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लांबत आहे. रब्बीचा हंगाम हा नोव्हेंबर ते मार्चपर्यंतचा असायचा. मात्र, दोन वर्षांपासून पाऊस लांबत असल्यामुळे रब्बी हंगाम देखील डिसेंबर ते एप्रिल असा घेतला जात आहे.
गव्हाच्या तुलनेत ज्वारीची पेरणी वाढणार -
शेतकऱ्यांकडून रब्बीच्या हंगामात यावर्षीही हरभऱ्यालाच प्राधान्य दिले जात आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात यावर्षी १ लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, गव्हापेक्षा ज्वारीला बाजारात मागणी जास्त आहे. तर ज्वारीला भाव देखील चांगला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडूून यावर्षी गव्हापेक्षा ज्वारीच्या पेरणीवर भर दिला आहे. तसेच गव्हाला पाण्याचीही गरज असते. तुलनेत ज्वारीला कमी पाणी लागते. म्हणून गव्हाच्या तुलनेत ज्वारीची पेरणी वाढू शकते.
रब्बीचे जिल्ह्यातील अंदाजित क्षेत्र - २ लाख २ हजार हेक्टर
आतापर्यंत पेरणी झालेले क्षेत्र - ३७ हजार २०० हेक्टर
पिकनिहाय क्षेत्र असे -
- ज्वारी- ३३ टक्के
- गहू - ६ टक्के
- मका -१६ टक्के
- हरभरा - २४ टक्के