जळगाव - जिल्ह्याला दुष्काळाच्या भीषण झळा बसत आहेत. सद्या जिल्ह्यात तब्बल २२५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या गावांना दोनशे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ न शकल्याने जिल्ह्यात टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
जळगाव जिल्ह्यातील 55 टंचाईग्रस्त गावांसाठी 52 तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, मंजूर असलेल्या 52 तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ 7 पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 45 योजनांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुमारे अडीच महिने टंचाईग्रस्त गावांसाठी मंजूर झालेल्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या तांत्रिक मान्यता रखडल्या होत्या. काही योजनांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची वेळ आली. त्यात बराच कालावधी वाया गेल्याने अनेक तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र, उन्हाचा तडाखा वाढतच गेल्याने पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत ज्या टंचाईग्रस्त गावाला तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती, त्या गावाला देखील टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. याच कारणामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या अजूनही वाढतच आहे.