जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, असे असताना जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असून, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. या विषयासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. बाजार समितीत यापुढे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाकारण्यात येणार असून, फक्त घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याबाबत माहिती देताना. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही, तर शेतकरी आणि ग्राहक यांना देखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीचा उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याच्या मुद्द्याकडे ईटीव्ही भारतने बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील परिस्थितीमुळे कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झाला तर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयाची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.
हेही वाचा -कोरोनाला खुलेआम निमंत्रण; जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
बाजार समिती सचिवांवर सोपवली जबाबदारी -
'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी सोपवली. त्याचप्रमाणे उद्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाकारावा. घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देऊन गर्दी होणार नाही, या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दिले.
दोन दिवसात बदल दिसणार -
येत्या दोन दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीतील बदल आपल्याला दिसून येतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक स्वरूपात कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.