जळगाव -पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून दीड महिन्यांपूर्वी माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपसोबत असलेला 40 वर्षांचा घरोबा मोडून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर खडसेंनी आता अचूक 'टायमिंग' साधल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी सध्या त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना सोबत घेऊन अख्खा जिल्हा पालथा घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच समर्थकांच्या गाठीभेटी घेऊन, जनतेशी संवाद साधून खडसेंकडून राजकीय चाचपणी सुरू आहे. या माध्यमातून राजकीय धडे देऊन रोहिणी खडसेंना राजकीय वारसदार म्हणून सूत्रे सोपवली जातील, असे बोलले जात आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या राज्याच्या राजकारणातील हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. परवा (मंगळवारी) 1 डिसेंबरला रोहिणी खडसेंचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत जळगावसह मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात चांगले वलय आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे, रावेर लोकसभा आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. ही पार्श्वभूमीवर असल्याने खडसेंच्या या दौऱ्यात सर्वच ठिकाणी रोहिणी खडसेंचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, रोहिणी खडसेंच्या स्वागताच्या कार्यक्रमांच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपच्या कार्यकर्त्यांचाही बरोबरीने सहभाग होता. एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने हे सर्वच कार्यक्रम पक्षीय मतभेद बाजूला सारून आयोजित करण्यात आले होते. खडसे कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी कार्यक्रमांचे आयोजन केल्याची कबुली खुद्द आयोजकांनी दिली. त्यामुळे खडसेंचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसून येत आहे.
रोहिणी याच खडसेंच्या राजकीय वारसदार?
अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे. वडिलांप्रमाणे उत्तम जनसंपर्क, जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची जाण, सहकार क्षेत्रातील अभ्यास या रोहिणी यांच्या जमेच्या बाजू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या राजकारणात आल्या आहेत. खडसेंच्या नेतृत्वाखाली त्यांची पुढची वाटचाल असणार आहे. त्यामुळे खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून रोहिणी यांच्या बाजूनेच अधिक मतप्रवाह आहे. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तरी आपण भाजप सोडणार नाही, असे रक्षा खडसेंनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर खडसे महाविकास आघाडीचा एक घटक झाल्यानंतरही रक्षा खडसेंनी केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. पीक विम्यासाठी त्यांचा लढा आजही सुरू आहे. त्यामुळे भविष्यात रक्षा खडसे भाजप सोडून खडसेंसोबत आल्या तरी त्या वेळेपर्यंत इकडे रोहिणी खडसे खडसेंसोबत राहून बऱ्याच पुढे निघून गेलेल्या असतील. अशा परिस्थितीत खडसे समर्थकांचे राजकीय वारसदार म्हणून रक्षा यांच्याऐवजी रोहिणी यांनाच झुकते माप असेल, यात शंका नाही.
रोहिणी यांचा आता होईल खरा राजकीय उदय -
2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून अॅड. रोहिणी खडसे या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला. भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी रोहिणी यांना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर जनतेपर्यंत जाण्यासाठी त्यांना खूपच कमी कालावधी मिळाला. शिवाय खडसेंना उमेदवारी न मिळणे, हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरून मुलीला निवडून आणणे म्हणजे, खडसेंना एकप्रकारे आव्हान होते. तरीही खडसेंनी हिंमत खचू न देता शक्य ते प्रयत्न केले. मात्र, भाजपने रोहिणी यांचा पराभव व्हावा म्हणून आतून प्रयत्न केले. त्यामुळेच रोहिणी यांचा पराभव झाल्याचे आजही बोलले जाते. खुद्द खडसेंनी हा आरोप अनेकदा जाहीर सभा, कार्यक्रमातून केला आहे. आता एकनाथ खडसे हे नव्या पक्षात आहेत. याठिकाणी त्यांना पक्षसंघटन वाढीसाठी पुरेपूर वाव आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंचा आता खऱ्या अर्थाने राजकीय उदय होईल, असेही बोलले जात आहे. विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, खडसेंच्या नावाला जर काही अडचण आली तर त्यांच्याऐवजी रोहिणी यांनाच संधी असेल. रोहिणी या सहकार आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत रोहिणी खडसे थेट विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करू शकतात.
हेही वाचा -एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य