महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2020, 9:29 PM IST

ETV Bharat / state

'बीएचआर' प्रकरणात 'बडे मासे'ही गळाला लागण्याची शक्यता; तिसऱ्या दिवशी चौकशीत सापडली भाजप नेत्याची कागदपत्रे?

पोलिसांना महापालिकेच्या ठेक्याची तसेच भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी निगडित काही कागदपत्रेही मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, त्यात आता बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा गुन्ह्याची कागदपत्रे तसेच इतर पुरावे घेऊन पोलीस पथके पुण्याला परतली.

जळगाव
जळगाव

जळगाव- येथील बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराची पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी पोलिसांनी या गुन्ह्यातील एका संशयिताच्या कार्यालयातून पतसंस्थेची कागदपत्रे जप्त केली. यावेळी पोलिसांना महापालिकेच्या ठेक्याची तसेच भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी निगडित काही कागदपत्रेही मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, त्यात आता बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा गुन्ह्याची कागदपत्रे तसेच इतर पुरावे घेऊन पोलीस पथके पुण्याला परतली.

जळगाव

बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह गैरव्यवहाराशी संबंधित व्यक्तींचे घर, आस्थापनांवर छापे टाकून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने विविध कागदपत्रे, संगणक तसेच इतर पुरावे गोळा केले आहेत. रविवारी जळगावात 13 ठिकाणी चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सीए महावीर जैन, धरम किशोर सांखला यांच्यासह पतसंस्थेचा कर्मचारी व अवसायक जितेंद्र कंडारे यांचा सहाय्यक सुजित बाविस्कर यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात व्यावसायिक सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साकला तसेच माहेश्वरी नामक व्यक्ती असे 6 जण संशयित आरोपी असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. व्यावसायिक सुनील झंवर हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. झंवर या प्रकरणात अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तिसऱ्या दिवशीही चौकशी सत्र -

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना खंडेराव घोरपडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडे यांची या पतसंस्थेत सुमारे 17 लाख रुपयांची गुंतवणूक होती. त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसांपूर्वी जळगावात दाखल झाले आहे. पथकात 103 पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. ज्यात 2 पोलीस उपायुक्त, 3 सहायक पोलीस आयुक्त आणि 25 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने रविवारी तिसऱ्या दिवशी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह सुनील झंवर यांच्या खान्देश मिल कॉम्प्लेक्समधील कार्यालय, अटकेतील संशयितांचे घर तसेच विविध आस्थापनांमध्ये चौकशी करत काही कागदपत्रे ताब्यात घेतली. व्यावसायिक सुनील झंवर यांच्या कार्यालयातून पोलिसांनी गिरीश महाजन यांच्याशी निगडित काही कागदपत्रे तसेच महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे जप्त केली. याला पथकातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. परंतु, नेमकी काय कागदपत्रे होती, याची माहिती देणे टाळले.

झंवर यांच्या कार्यालयात बसून अवसायक करायचे काम -

या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुनील झंवर यांनी बीएचआर पतसंस्थेची एक बनावट वेबसाईट त्यांच्या कार्यालयात तयार केली होती. या वेबसाईटवरुन झंवर यांना बीएचआर व कर्जदारांच्या कुठल्या मालमत्ता विक्री करायच्या आहेत? हे समजत होते. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे हे संस्थेच्या कार्यालयात न जाता झंवर यांच्या कार्यालयातच बसून काम पाहत होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अवसायक, सीए, व्यावसायिक यांनी संगनमत हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलीस तपास त्या दिशेने पुढे जात आहे.

अवसायक जितेंद्र कंडारेच्या घरातून मिळाले लाखोंचे घबाड -

चौकशी दरम्यान, पोलीस पथकाने अवसायक जितेंद्र कंडारेंच्या घरातून 9 लाख 78 हजार रुपयांची रोकड, 21 लाख 92 हजार 840 रुपयांचे सोन्याचे दागिने व 3 लाख 34 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. कंडारे यांनी गैरव्यवहारातून अपसंपदा जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून आपल्या घरी छापा पडल्याची माहिती झाल्यानंतर कंडारे नगर येथून फरार झाले आहेत.

झंवर यांच्या कार्यालयात मिळाले शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के!

या गुन्ह्यातील संशयित सुनील झंवर यांच्या कार्यालयात एक पिशवी भरुन शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के देखील पोलिसांना सापडले आहेत. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी ते मुख्याध्यापक अशा अनेकांचे बनावट शिक्के आढळून आल्याची माहिती आहे.

हे प्रकरण घरकूल गैरव्यवहारापेक्षा मोठे - अ‌ॅड. विजय पाटील

बीएचआरच्या चौकशी प्रकरणी जळगाव महापालिकेतील घरकूल घोटाळ्याचे मूळ तक्रारदार नरेंद्र पाटील यांचे बंधू ऍड. विजय पाटील यांनी शनिवारी रात्री पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची भेट घेतली होती. या गुन्ह्यात पोलीस प्रशासनाला तपासात सहकार्य करण्यासाठी गरज पडल्यास त्रयस्थ अर्जदार म्हणून भूमिका घेण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. घरकूल गैरव्यवहार 40 कोटींचा होता. मात्र, अवसायकाच्या काळात बीएचआरमध्ये झालेला गैरव्यवहार हा 1100 कोटींपेक्षा जास्त असल्याची शक्यता ऍड. विजय पाटील यांनी वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details