जळगाव -पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करणाऱ्या तरुणाने रेल्वेखाली झोकून देण्यापूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह करत आपण जगाचा निरोप घेत असल्याची माहिती दिली. प्रमोद शेटे (वय ३१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो जळगावातील कांचननगरातील रहिवासी होता. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबीक वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रमोद शेटे याचा कांचन शेटे (वय २६) हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. कांचन शेटे हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू विष घेऊन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. कांचनच्या मृत्यूनंतर प्रमोद याने जळगावातील आसोदा रेल्वेगेट परिसरात धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. कौटुंबीक वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. कांचनचा मृतदेह जिल्हा रुग्णालय असलेल्या शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात हलवण्यात आला आहे, तर प्रमोदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात शनिपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या अशी झाली घटना उघड -रेल्वेखाली आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून फेसबुक लाईव्ह करत आपण आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. ही बाब प्रमोदच्या काही मित्रांना फेसबुकच्या माध्यमातून कळाली. त्यानंतर मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी घरी धाव घेतल्यानंतर प्रमोदची पत्नी कांचन ही घरात मृतावस्थेत आढळली. त्यानंतर प्रमोदच्या मित्रांनी कांचननगरापासून जवळच असलेल्या रेल्वे रुळांकडे धाव घेतली असता, त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत रुळांच्या बाजूला पडलेला आढळला. नंतर या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिपेठ पोलिसांना दिली.
हेही वाचा -तीन महिन्यांपासून पगार नसल्याने घराच्या कर्जाचे हफ्ते थकले; त्याच नैराश्यातून 'मनोज' यांनी केली आत्महत्या!फेसबुक लाईव्ह करताना भावनाविवश झाला प्रमोद -आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद याने फेसबुक लाईव्ह केले. यावेळी बोलताना तो भावनाविवश झाल्याचे समजते. फेसबुक लाईव्हमध्ये त्याने 'सर्वात आधी जन्म देणाऱ्या आईला, वडिलांना माझा नमस्कार, माझा दुसरा नमस्कार मला जन्म दिल्यानंतर सांभाळणारे आजी-बाबांना, माँ आणि आप्पा यांना. जन्मभर साथ देण्याची शपथ घेणारी मरण पावल्याने मी आता शेवटचे २ मिनिटे बोलत आहे. शेवटचा गुडबाय करत आहे. मी तुम्हाला माझा चेहरा दाखवू शकत नाही. माझी पत्नी या जगात राहिली नाही, त्यामुळे मलाही जगण्यात इंटरेस्ट राहिला नाही', असा भावनिक संवाद प्रमोदने लाईव्हच्या माध्यमातून साधला आहे. फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर त्याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मद्यप्राशन केले असावे, असा अंदाज आहे. कारण त्याने ज्याठिकाणी फेसबुक लाईव्ह केले आहे, त्याठिकाणी मद्याची रिकामी बाटली, मद्याने भरलेला पेग, काही खाद्यपदार्थ असे साहित्य आढळले आहे.
पत्नीच्या मृत्यूचे गूढ -
प्रमोदची पत्नी कांचन हिच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. तिचा मृत्यू विष घेऊन झाल्याचे दिसून येत आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याची बाब प्रमोदला माहिती होती, हे त्याच्या फेसबुक लाईव्हवरून स्पष्ट होत आहे. जर त्याला ही बाब माहिती होती तर त्याने आपल्या कुटुंबीयांना न सांगता आत्महत्या का केली? त्यानेच पत्नीला विष देऊन मारले की काय? असे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यात काहीतरी वाद झाला असावा, त्यातूनच ही घटना घडली असावी, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास शनिपेठ पोलीस करत आहेत.
हेही वाचा -पत्नीवर वार करुन पतीची आत्महत्या, तळोजातील घटना