जळगाव- शहराच्या समता नगरातील धामणगाव वाडा भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३) याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १ लाख ३५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे.
काय घडले होते त्या दिवशी -
आरोपी आदेश बाबाने १२ जून २०१८ रोजी धामणगाव वाडा भागातील एका ९ वर्षीय बालिकेचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने बालिकेवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला. या प्रकारानंतर त्याने रात्रीच्या अंधारात बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून घराशेजारीच असलेल्या टेकडीवर नेऊन पुरावा नष्ट करण्याचादेखील प्रयत्न केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आदेशबाबाला अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
बालिकेवर अत्याचार करुन खून, 'आदेशबाबा'ला मरेपर्यंत जन्मठेप या खटल्यात एकूण २७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सबळ पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून न्यायालयाने आदेशबाबाला दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची तसेच १ लाख ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके, मूळ फिर्यादीतर्फे अॅड.एस.के. कौल यांनी काम पाहिले. तर बचावपक्षातर्फे विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अॅड. गोपाल जळमकर व विजय दर्जी यांनी काम पाहिले.
- कलम ३६३ - ४ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद
- कलम ३७६ (३) - मरेपर्यंत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद
- कलम ३७६ (अ) - मरेपर्यंत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद
- कलम ३०२ - जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद
- कलम २०१ - ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद
- पोक्सो कलम - ६ - १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद