जळगाव - वसीम रिझवी यांनी जगभरात इस्लाम धर्माची बदनामी केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवावा, या प्रमुख मागणीसाठी जळगावात अल्पसंख्याक सेवा संघाच्या वतीने मंगळवारी दुपारी 'जोडे मार आंदोलन' करण्यात आले. शहरातील टॉवर चौकात हे आंदोलन झाले.
काय आहे प्रकरण?-
अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे वसीम रिझवी यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. वसीम रिझवी या व्यक्तीने कुराण शरीफमध्ये असलेली २६ आयते काढून टाकण्याची मागणी केली असून, या विषयासंबंधी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या कृत्यामुळे इस्लाम धर्माची जगभरात बदनामी झाली आहे. म्हणून रिझवी यांच्या विरोधात इस्लाम धर्मीय आक्रमक झाले आहेत.
धर्मग्रंथात न्यायपालिका हस्तक्षेप करू शकत नाही-
कुराण शरीफ असो किंवा इतर कोणताही धर्मग्रंथ असो, यावर संशोधन किंवा न्यायपालिका अधिकारक्षेत्रात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. घटनेत तशी तरतूद करण्यात आली आहे. असे असताना वसीम रिझवी याने केलेले कृत्य इस्लाम धर्माची बदनामी करणारे आहे. म्हणून त्याला न्यायालयाने कडक शासन करावे. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जावू नये व अशा व्यक्तीमुळे संपूर्ण देश हा बदनाम होत आहे, याची नोंद घ्यावी, अशी भूमिका अल्पसंख्याक सेवा संघाने मांडली आहे.