जळगाव -महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया उद्या (गुरुवारी) पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेत आज (बुधवारी) शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन यांनी तर उपमहापौर पदासाठी, भाजपत बंडखोरी करून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी आपले प्रत्येकी २ अर्ज दाखल केले.
महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यात दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजची शेवटची मुदत आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून महापौर व उपमहापौर पदासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत असून, देखील भाजपकडून अद्याप आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. भाजपच्या ३० नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केल्याने भाजप 'बॅकफूट'वर गेला आहे. त्यामुळे भाजप नेते सावध पावले टाकत आहेत. ऐनवेळी काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले जात आहे.
बंडखोर कुलभूषण पाटील जळगावात परतले -
भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांना शिवसेनेकडून उपमहापौर पदाची संधी मिळाली आहे. आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जळगावात परतले. त्यांच्यासोबत भाजपचे सभागृह नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे तसेच इतर नगरसेवक देखील जळगावात दाखल झाले आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत अर्ज दाखल करताना सोबत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कुलभूषण पाटील म्हणाले की, आमची कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नव्हती. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. निर्णय प्रक्रियेत डावलले गेले. भाजपकडे बहुमत होते. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय होणे अपेक्षित होते. शहराच्या विकासाची जबाबदारी ही स्थानिक आमदारांवर असताना त्यांनी सातत्याने ठेकेदारीला पाठबळ दिले. आम्ही हा विषय वेळोवेळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे मांडला. पण त्यांनीही लक्ष दिले नाही. शेवटी आम्हाला नाईलाजाने शिवसेनेसोबत जाण्याचा हा निर्णय घ्यावा लागला. मी आज शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!
दोन्ही पदांवर विजय आमचाच - जयश्री महाजन
शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, आज मी शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संख्याबळाबाबत आश्वस्त केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पदांवर आमचा विजय होईल, अशी आपल्याला खात्री असल्याचे जयश्री महाजन यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी घेतला शिवसेनेने पुढाकार- नितीन लढ्ढा