जळगाव - शहरातील रिंगरोड परिसरातील दिनानाथ वाडी भागात असलेल्या एका घरात झालेल्या घरफोडीचा जिल्हापेठ पोलिसांनी उलगडा केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दोघांकडून 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जळगाव कृषी विभागात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनिल किशोर पाटील हे रिंगरोड परिसरातील दिनानाथ वाडी भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्या बंद घरात ही घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घरातून चांदीची भांडी तसेच काही ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक कृषी अधिकारी पाटील यांच्या घरात डल्ला मारणारे दोन अल्पवयीन मुले असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या मुलांची माहिती काढून त्यांना तांबापुरा भागातील बिलाल चौकातून ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी सुरू असून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे