जळगाव- जिल्हा पोलीस दलाने सायबर क्राईम विषयक जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या ८ महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये पोलीस दलाच्या मीडिया व्हॅनद्वारे सायबर क्राईम म्हणजे काय? फसवणूक कशी टाळावी? मदत कशी मिळवावी? याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
हिगोंलीमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक होण्यास मदत झाली. मात्र, काही समाजविघातक शक्तींनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. 'सायबर क्राईम' हा त्याचाच एक भाग आहे. कोणाच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढले. कोणाला लॉटरी लागली म्हणून तर कोणाला नोकरीच्या आमिषाने पैसे भरण्यास सांगून फसवणूक झाली. एखाद्या महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवणे अशा प्रकारच्या बातम्या आपण दररोज येत असतात. हे सारे गुन्हे सायबर क्राईम प्रकारात मोडतात. सायबर क्राईम जगभरातून कोठूनही घडू शकतो. कळत नकळत कोणीही त्याचा बळी ठरू शकतो. सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सजगता हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गेल्या ८ महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २०० शाळा व महाविद्यालयातील ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी तसेच साडेपाचशे मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधील हजारो लोकांमध्ये सायबर क्राईम विषयक जनजागृती करण्यात आली आहे.