जळगाव : जळगावात जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा पथकावर काळाने घाला घातल्याची बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या वाहनावर झाड कोसळल्याची घटना असून या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले होते. पण रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळले. या घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला.
कधी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक जळगाव जिल्ह्यातील पिलखोड या गावातील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात होते. या गावाकडे जात असतानाच काळाने पोलिसांवर काळाने घाला घातला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणे 9 वाजण्याच्या सुमारास अंजनी धरणालगत घडला. या दुर्घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला. तर गाडी असलेले इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाड पडल्याने पथकाच्या वाहनाची पूर्णपणे चेंदा झाला आहे. गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या घटनास्थळी पोहोचल्या.