जळगाव- देशात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, जळगावात महिला आघाडीला पदाधिकारीच नसल्याने हे आंदोलन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीवर पदाधिकारी नसल्याने आंदोलन रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.
जळगाव : पदाधिकारी नसल्याने आंदोलन टाळण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसवर नामुष्की
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.
अनेक राज्यांत पेट्रोल शंभर पार-
अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर तीन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरू झाली आहे.
जळगावात आंदोलन झालेच नाही-
याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर खाली चूल मांडो आंदोलन करण्यात येत आहे. जळगावात हे आंदोलन झालेच नाही. याबाबत माहिती घेतली असता, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर जळगाव शहर महिला अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे जळगावात हे आंदोलन झाले नसल्याचे सांगण्यात आले.
महिला आघाडीच्या आंदोलनाचा फियास्को-
राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीला पदाधिकारी नसल्याने आंदोलन रद्द करण्याची नामुष्की आली आहे. संघटना बळकट करण्यासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यात संवाद यात्रा केली होती. त्यावेळी त्यांनी तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. याशिवाय एकनाथ खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी येईल, असे चित्र होते. मात्र आज महिला आघाडीच्या आंदोलनाचा फियास्को झाल्याने राष्ट्रवादी पक्ष भाजपचा कसा सामना करणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.