महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात भाजपचेच निर्विवाद वर्चस्व

रावेर मतदारसंघात विद्यमान आमदार आणि खासदार रक्षा खडसेंनी केलेली विकासकामे, जनसंपर्क या गोष्टी देखील विजयाच्या बाजूने सकारात्मक ठरल्या. नवमतदार भाजपकडे आकर्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, या निकालामुळे गिरीश महाजन यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा होत आहे.

एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे

By

Published : May 24, 2019, 5:20 PM IST

Updated : May 24, 2019, 7:45 PM IST

जळगाव - लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. युतीच्या नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी प्रचंड आव्हानात्मक राहणार आहे.

जळगाव आणि रावेर मतदारसंघाचा आढावा

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने २ वेळा उमेदवार बदलून ऐनवेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे, पक्षांतर्गत नाराजी वाढली. मात्र, मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वेळीच 'डॅमेज कंट्रोल' रोखून आपली राजकीय शक्ती लावत जळगावात परिस्थिती बदलली. उन्मेष पाटील यांच्याकडे असलेले युवा संघटन, मोदी फॅक्टर, राष्ट्रहित तसेच विकासाकडे तरुणांचा असलेला कल यामुळे नवमतदार भाजपकडे आकर्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचेही संघटन उत्तम असल्याने उन्मेष पाटलांना याचा फायदा झाला. या निकालामुळे गिरीश महाजन यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा होत आहे.

रावेर मतदारसंघात विद्यमान आमदार आणि खासदार रक्षा खडसेंनी केलेली विकासकामे, जनसंपर्क या गोष्टी देखील विजयाच्या बाजूने सकारात्मक ठरल्या. त्याचप्रमाणे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे मतदारसंघात मोठे प्राबल्य आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजप-सेनेचे वर्चस्व आहे. लेवा आणि मराठा समाजाचा खडसे कुटुंबियांना असलेला पाठिंबा ही बाब देखील रक्षा खडसेंच्या पथ्यावर पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डॉ. उल्हास पाटील यांना यावेळीही रावेरकरांनी नाकारले. काँग्रेसचे कमजोर पक्षसंघटन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ऐनवेळी प्रचारातून घेतलेली माघार यामुळे डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव झाला. रावेरमध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक नवमतदार वाढले आहेत. तरुणांचा कल भाजपच्या बाजूने होता. नवमतदारांमुळे रक्षा खडसेंचे मताधिक्य गेल्या वेळेस पेक्षा १५ ते २० हजार मतांनी वाढले. रक्षा खडसेंना दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. परंतु, त्यांच्या उमेदवारांनी मिळवलेली मते निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. रावेरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांना तब्बल ८८ हजार मते मिळाली. तर, जळगाव मतदारसंघात अंजली बाविस्कर यांनाही ३८ हजार मते मिळवून आगामी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Last Updated : May 24, 2019, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details